वस्त्रोद्योग धोरण बैठकीवरून राज्यात मानापमान रंगले; राजकीय हेतूने बैठक आयोजित केल्याचा आरोप

राज्य शासनाचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाल्यानंतर अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीवरून राज्यात मानापमान रंगले आहे. -


June 26, 2023 कोल्हापूर : राज्य शासनाचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाल्यानंतर अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीवरून राज्यात मानापमान रंगले आहे. या बैठकीसाठी इचलकरंजीतील यंत्रमागधारकांच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले असताना अन्य प्रमुख केंद्रातील संघटनांना डावलले असल्याने त्यांच्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय हेतूने बैठक आयोजित केल्याचा आरोप होत आहे.

राज्य शासनाने अलीकडेच २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असणारे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले. त्याचे राज्यातील वस्त्र उद्योग केंद्रात थंडे स्वागत झाले. त्यावर या धोरणाचे महत्त्व विशद करण्यासाठी गेल्या आठवड्यात एका बैठकीचे आयोजन केले असता निवडक लोकांना निमंत्रण केल्याची टीका होऊ लागली. सुधारणा करीत राज्यात आयुक्तालय निहाय केंद्रांमध्ये बैठक आयोजित करण्याचे ठरले. त्याही रद्द करण्याचा निर्णय लगेचच घेण्यात आला.

शिवसेनचा सबंध काय ?
आता वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (२७ जून) पुन्हा बैठक होणार असून वस्त्रोद्योग आयुक्त वगळता आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि यंत्रमागधारक संघटनांना निमंत्रित केले आहे. त्यावरून विकेंद्रित केंद्रामध्ये मानापमान नाट्य सुरू झाले आहे. यंत्रमागधारकांच्या बैठकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना निमंत्रित करण्याचे कारण काय अशी विचारणा करण्यात आली आहे.

इचलकरंजीचे लाड कशासाठी ?
इचलकरंजीतील तब्बल ५ संघटनांना कोणत्या निकषावर निमंत्रित केले आहे. यापैकी किती संघटना नोंदणीकृत असून त्यांचे सदस्य नोंदणी आहे का, भिवंडी व मालेगाव या राज्यातील दोन प्रमुख केंद्र असून येथे डझनभर प्रमुख संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी एकालाही निमंत्रित का केले नाही असा प्रश्न भिवंडी पॉवरलूम मजूर बीमविव्हर्स यंत्रमागधारक असोसिएशनचे अध्यक्ष तिरुपती सिरीपुरम यांनी उपस्थित करून गळवारची बैठक राजकीय हेतूने आयोजित केली असून मुद्देसूद मांडणी करणाऱ्या संघटनांना निमंत्रित केले नाही, असे म्हटले आहे. ही बैठक केवळ इचलकरंजीचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे का, अशी विचारणा केली जात आहे.

मालेगावात संताप
मालेगाव हे राज्यातील सर्वात मोठे केंद्र असून येथे १ संघटना असताना एकालाही का निमंत्रित केले नाही, अशी विचारणा मालेगाव पॉवरलूम उद्योग विकास समितीचे अध्यक्ष साजिद अन्सारी यांनी केली आहे. इचलकरंजीतील प्रतिनिधी हे अत्याधुनिक शटललेस मागधारकांचे विषय मांडणारे असल्याने त्यांच्याकडून साध्या मागाला न्याय मिळत नाही. त्यांची निवड कोणत्या निकषावर झाली याचा खुलासा व्हावा, अशी मागणी मालेगाव पॉवरलूम बुनकर असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीरभाई डेगवाले यांनी केली आहे. वस्त्रोद्योग धोरण असणाऱ्या समितीतील अनेक सदस्यांनाही डावलण्याचे कारण काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Share to ....: 418    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 40176145

Saying...........





Cotton Group