Cotton Market : दिवाळी सणाची धामधूम आणि बाजारात कापूस दर हमीभावापर्यंत स्थिर असल्याने शासकीय कापूस खरेदीसंबंधी शेतकऱ्यांच्या शासकीय नोंदणीला कमी प्रतिसाद मिळाला आहे. -
November 18, 2023 Jalgaon News : भारतीय कापूस महामंडळाने खानदेशात कापूस खरेदीची तयारी मागील पंधरवड्यात पूर्ण केली. त्यासंबंधी शेतकऱ्यांची नोंदणीदेखील केंद्रांत सुरू केली, परंतु या नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
दिवाळी सणाची धामधूम आणि बाजारात कापूस दर हमीभावापर्यंत स्थिर असल्याने शासकीय कापूस खरेदीसंबंधी शेतकऱ्यांच्या शासकीय नोंदणीला कमी प्रतिसाद मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात तीन हजारहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही.
धुळे व नंदुरबारात मिळून एक हजार शेतकऱ्यांनीदेखील नोंदणी केलेली नाही. खानदेशात खरिपात १४ लाख हेक्टरपैकी कापसाची साडेआठ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. कापूस उत्पादकांची संख्या मोठी आहे. परंतु शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणीबाबत प्रतिसाद दिलेला नाही.
जळगाव जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव, बोदवड, जामनेर, पहूर, शेंदूर्णी, भुसावळ, जळगाव येथे कापूस महामंडळाने खरेदीसंबंधी केंद्र नियुक्त केले आहेत. धुळ्यात शिरपूर, नंदुरबारात शहादा व नंदुरबार येथेही खरेदीसंबंधी केंद्र निश्चित आहेत.
कापूस महामंडळ ७०२० रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना देणार आहे. परंतु खानदेशातील बाजारात कापसाचे खेडा खरेदीसंबंधीचे दर सात हजार रुपयांपेक्षा अधिक व काही भागात सात हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. अनेक शेतकरी खेडा खरेदीत किंवा थेट खरेदीतच कापसाची विक्री करीत आहेत.
तसेच दिवाळीच्या सणामुळे अनेक शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात कापूस विक्रीसंबंधी नोंदणी करणे प्रलंबित ठेवले. कापूस महामंडळाने कापूस विक्रीसंबंधी केंद्रात नोंदणीचे जाहीर आवाहन केले. परंतु यानंतरही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. नोंदणी बऱ्यापैकी किंवा समाधानकारक होईल, त्यानंतर कापूस महामंडळ खरेदीचा निर्णय घेईल किंवा ज्या वेळेस कापसाचे दर हमीभावाच्या खाली येतील, त्या वेळी खरेदी सुरू केली जाईल, अशी माहिती मिळाली.