Cotton Seed: कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी अडचणीत, दर पडल्यानंतर नवं संकट, नामांकित वाण एका दिवसात गायब

... -


June 06, 2023 यवतमाळ : मृग नक्षत्र अवघ्या दोन दिवसांवर असल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीसाठीची लगबग वाढली आहे. बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. पण, प्रसिद्ध कंपन्यांचे बियाणेच मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. चार पाकिटांची मागणी केली असता केवळ निम्मे दिले जात आहेत. हलक्या दर्जाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह धरला जात असल्याने साठेबाजीचा धोका व्यक्त होत आहे. यासंदर्भातील तक्रारी वाढत असल्याने सरकारने वेळीच उपाय योजण्याची मागणी जोर धरत आहे.

मृग नक्षत्रात कापसाच्या पेरणीला सुरुवात होते. सिंचनाची सोय असलेले शेतकरी धूळपेरणी करतात. पावसाची वाटचाल समाधानकारक राहिल्यास कोरडवाहूतही पेरणी केली जाते. वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून शेतकरी आधीच बियाणे आणि खताची खरेदी सुरू करतात. केरळमध्ये मान्सूनची वाटचाल होऊ लागल्याने लगबग अधिकच वाढली आहे.

यवतमाळ जिल्ह्याचा विचार करता ९ लाख २ हजार ७२ हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो. यातील सर्वाधिक ४ लाख ५५ हजार क्षेत्र कापसाचे तर २ लाख ८६ हजार १४४ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. कापसाचे क्षेत्र पाहता २२ लाख ७५ हजार पाकिट बियाण्यांची मागणी कृषी केंद्रचालकांनी नोंदविली आहे. बाजारात बियाणेही उपलब्ध आहेत. पण, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या कंपन्यांचे बियाणे मिळत नाहीत. चार पाकिट मागताच केवळ दोन दिले जात आहेत. इतर दोन पॅकेट विशिष्ट कंपन्यांचे घ्यावे, असाही आग्रह होतो. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा झाल्यास शेतकरी तेलंगण सीमेवरील आदिलाबाद जिल्ह्यातून बियाणे खरेदी करून आणत असत. तिथेही प्रसिद्ध कंपन्यांचे बियाणे उपलब्ध होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अतिवृष्टीत उद्‌ध्वस्त झालेले पीक आणि सरकारकडून नवतंत्रज्ञानाला मान्यता देण्याविषयी चर्चा या बियाणे टंचाईसाठी कारणीभूत असल्याची माहिती कृषी साहित्याचे ठोक विक्रेते रमेश बुच यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
विक्रेते म्हणतात...

- बियाणे व्यवसायातील नामवंत कंपन्यांकडे विक्रेत्यांनी बियाण्यांची मागणी आधीच नोंदविली आहे.

- शेतकऱ्यांची मागणी असलेल्या बियाण्यांचा पुरवठा कंपनीकडून कमी होत आहे. त्यामुळे तुटवडा दिसत आहे.

- मुळात बियाणे उत्पादनाचे काम दिलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत नुकसान झाले.

- दुसरीकडे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी केंद्राकडून मान्यता मिळण्याची चर्चाही वाढली.

- हे प्रत्यक्षात आल्यास जुने तंत्रज्ञान असलेले बियाणे वाया जाईल, अशी भीती मोठ्या कंपन्यांना होती.

- याचाही परिणाम उत्पादनावर झाल्याचा दावा.
एका दिवसात बाजारपेठेतून बेपत्ता

‘कबड्डी’ आणि ‘पंगा’ हे कापसाचे वाण एका दिवसात बाजारपेठेतून बेपत्ता झाले आहे. ८०० रुपये प्रती पॅकेटचे हे वाण १ हजार ३०० ते १ हजार ४०० रुपयांत शेतकऱ्यांना विकले जात असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या लक्षात आणून दिले आहे. या साठेबाजीवर आळा घालून हे दोन्ही वाण शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कबड्डी आणि पंगा या कापसाच्या वाणाला पसंती दर्शविली आहे. १ जूनपासून हे दोन्ही बाजारात उपलब्ध करून देण्यात आले. मात्र काही तासांतच हे दोन्ही वाण बाजारातून गायब झाले. यातून साठेबाजीची शक्यता असल्याचेही आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.


Share to ....: 273    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31523494

Saying...........
Love is a matter of chemistry; sex is a matter of physics.





Cotton Group