| विदर्भात होणार पाच टेक्सटाइल पार्क
नागपूर - राज्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या 10 पैकी पाच टेक्सस्टाईल पार्क
विदर्भात होतील. विदर्भातील कापूस उत्पादकांसह जिनिंग प्रेसिंगला
पुनरुज्जीवित करण्याचा शासनाचा हा एकप्रकारचा प्रयोगच म्हणावा लागेल.
विदर्भ हा कापूस उत्पादकांचा प्रांत आहे. या भागातील कापसाला योग्य भाव मिळत नसल्याची कायमची ओरड आहे. त्यातच यंत्रमाग व हातमाग उद्योगही उपेक्षित ठरत आहे. त्यामुळे टेक्सस्टाईल पार्क उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव या उद्योगाला भरभराटी आणण्याचा प्रयत्नच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर येथे हे पार्क उभारण्यात येतील. कॉटन जिनिंग, जिनिंग प्रेसींग आणि स्पिनिंग अशा सर्वांचे एकत्रित युनिट म्हणजे टेक्सटाईल पार्क असेल. सध्या 25 हजार 200 गाठी तयार करणारे सर्वसाधारण क्षमतेचे एक पार्क आहे. मात्र, यासाठी जवळपास 100 एकर जागा लागते. शिवाय त्यावर 60 कोटींचा खर्च होतो. त्याऐवजी 12 हजार 500 गाठींचे एक युनिट स्थापण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी 30 ते 35 एकर जागेत 30 कोटी खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव सक्षम असून, त्यावर कमी खर्च व जागाही कमी लागते. यातूनच छोटे छोटे टेक्सस्टाइल पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. शिवाय, असे पार्क उभे झाल्यावर त्यात खासगी भागीदारीतून हातभार लावण्याचा प्रयत्न राहील. फॅब इंडिया, बिग बाजार, आयटीसीसारख्या कंपन्यांसोबत करार करून पार्कमध्ये तयार झालेली कापडे थेट अशा कंपन्यांच्या प्रतिष्ठानात विक्रीस ठेवल्या जातील. यातून कापूस उत्पादक व शासनालाही फायदा होईल. यासोबतच कंत्राट फार्मिंगची संकल्पनाही यातून रूढ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यात संबंधित कापूस उत्पादकाकडून त्याच्या शेतातील कापूस घेण्याचा करारही करण्याचे प्रयत्न होत आहे. वर्षभरासाठी त्याच्या शेतातील कापूस खरेदी करून त्याला तेवढा ठराविक मोबदला देण्याची योजना आहे. "ऍम्बॅसेडर' नेमणार! आज केवळ वस्तूच नव्हे तर शासनही त्यांच्या योजना लोकाभिमुख व लोकप्रिय करण्यासाठी "ऍम्बॅसेडर' संकल्पना राबवीत आहे. व्यावसायिक प्रतिष्ठाने जाहिराती करीत असताना शासकीय पातळीवर ऍम्बॅसेडरच्या माध्यमातून यात पाऊल टाकत आहे. यंत्रमाग व हातमागापासून तयार होणाऱ्या कापडांचे मार्केटिंग करण्यासोबतच विभागालाही नावानुरूप करण्यासाठी हा प्रयोग करण्याचे ठरविल्या गेले आहे.
|