शेतीपूरक व्यवसायांसाठी सहकार्य करू -राणे

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता धर्याने परिस्थितीचा सामना करावा. शेतीपूरक व्यवसायांसाठी शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्य़ातील बोपी आणि लोणी येथील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना दिली. प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्पांसाठी सिंचनाचे पाणी पळवण्यात येत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या अहिताचे निर्णय घेतले जाणार नाही, असे आश्वासन दिले.
नारायण राणे यांनी सोमवारी रात्री अकोला मार्गावरील बोपी या लहान गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार वीरेंद्र जगताप, रवी राणा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रकाश भारसाकळे, विभागीय आयुक्त दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी ऋचा बागला, पॅकेज महासंचालक माळाकोळीकर, सरपंच श्रीमती हांडे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला सरपंच श्रीमती हांडे यांनी गावातील परिस्थितीची माहिती राणे यांना दिली. आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्पांमुळे उद्भवलेल्या प्रश्नांकडे राणे यांचे लक्ष वेधले. सोफिया प्रकल्पासाठी अप्पर वर्धा धरणातील सिंचनाचे पाणी पळवले जात आहे. आधीच या भागात सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. त्यातच या प्रकल्पांना पाणी दिल्यास सिंचनावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. या विषयावर सरकारचे चुकत असून आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी आणि औष्णिक वीज प्रकल्प रद्द करावे, असे जगताप म्हणाले.
त्यावर बोलताना राणे म्हणाले की, आपण भावनिक आश्वासन देणार नाही पण, आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्य़ांची प्राथमिकता सिंचनाची आहे. या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालू. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी या गावात आलो आहोत. आर्थिक संकटात सापडूनही गावकऱ्यांनी ज्या सहजतेने प्रतिकूल परिसिथतीवर मात केली, हे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शासनाकडे केवळ मागण्या न करता पॅकेज अंतर्गत दिलेल्या सुविधांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेती फुलवली. हे कौतुकास्पद आहे, असे राणे म्हणाले.
अपुऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे पण, ज्या पिकांना बाजारपेठेत मागणी आहे, अशी पिके आपण घेतली पाहिजे. कृषीवर आधारित उद्योग या भागात उभे करणे आणि उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे परिश्रमातून ऊस शेती आणि त्यावर आधारित कारखानदारी केली जाते. त्याचप्रमाणे विदर्भात कापूस व सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग या भागात उभे व्हायला हवेत. शासन आपल्यासोबत आहे, असे नारायण राणे म्हणाले.
जिल्ह्य़ातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि कोरडवाहू शेतात छोटय़ा तलावांसह सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी वीरेंद्र जगताप यांनी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतीसोबतच दुधाचे उत्पादन वाढवावे आणि प्रगती करावी, असे आवाहन नारायण राणे यांनी केली. जिल्हाधिकारी ऋचा बागला यांनी अतिथींचे स्वागत केले, तर उपविभागीय अधिकारी गजेंद्र बावने यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.