‘कपास से कपडा तक’ प्रकल्प यवतमाळात

केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने ‘कपास से कपडा तक’  म्हणजेच ‘कापसापासून तर कापडापर्यंत’ हा प्रायोगिक तत्त्वावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्य़ासाठी मंजूर झाला आहे. कोटय़वधी रुपये खर्चाचा हा प्रकल्प ‘पॅन-आयआयटी’ तसेच रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि जिल्हा परिषदेच्यावतीने राबवला जाणार आहे. प्रकल्पासाठी बाभूळगाव तालुक्यातील टाकळगावची निवड करण्यात आली असून प्रकल्पाचे काम पॅन-आयआयटीचे संजय मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच सुरू होणार आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी जिल्हा परिषदेला २० लाखांचा पहिला हप्ताही दिला आहे.प्रकल्पाची माहिती अमरावतीचे विभागीय आयुक्त दिनेश वाघमारे, यवतमाळचे जिल्हाधिकारी संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्र कुळकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल माणिकराव ठाकरे आणि संबंधितांना शनिवारी विश्राम भवनावर देण्यात आली. रोटरी क्लबचे अध्यक्ष जलालुद्दीन गिलाणी व त्यांच्या चमूने आमदार नीलेश पारवेकर यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्य़ात साकारणार आहे.