| कपाशी पिकात नवीन तंत्राचा अवलंब गरजेचा - डॉ. मेहेत्रे
कापूस पिकामध्ये बीटी जनुकांनी प्रवेश केल्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली,
तरीही विविध शरीरक्रिया विकृतीमुळे मुख्यत्वे लाल्या व आकस्मिक मर यामुळे
उत्पादनात मोठी घट जाणवते. कपाशीवरील नवीन तंत्राचा (शरीरक्रिया विकृती
व्यवस्थापन) अवलंब शेतकऱ्यांनी गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कापूस
पैदासकार तथा तज्ज्ञ संचालक डॉ. सुभाष मेहेत्रे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कापूस विकास संचालनालय (मुंबई) यांच्या वतीने
कापूस तंत्रज्ञान मिशन २ कार्यक्रमांतर्गत कापूस शरीरक्रिया विकृती व्यवस्थापन
या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक प्रशिक्षण वर्गात डॉ.
मेहेत्रे बोलत होते. आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश,
ओरिसा, राजस्थान, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या १२
राज्यांच्या कृषी विभागातील उपविभागीय, तालुका कृषी अधिकारी, तसेच कृषी विज्ञान
केंद्रातील अधिकारी या वर्गात सहभागी झाले होते.
डॉ. मेहेत्रे म्हणाले की, भारतीय कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, तसेच
मध्यवर्ती कापूस संशोधन संस्था (नागपूर) या संस्थांनी कपाशीवरील विकृती
व्यवस्थापनावर संशोधन व शिफारशी तयार केल्या असून, कापूसउत्पादकांनी त्याचा लाभ
घ्यावा. बीटी कपाशीची पाने लाल होण्याचे मुख्य कारण नत्राची कमतरता होय.
त्यासाठी प्रमाणित १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या खत
मात्रेपेक्षा सव्वा ते दीडपट अधिक खतमात्रा कपाशीला द्यावी.
कापूस विकास संचालनालयाचे सहसंचालक डॉ. एम. एस. कोल्हटकर यांनी अधिक
उत्पादनासाठी विस्तार यंत्रणा सक्षम करण्याची गरज व्यक्त केली.
वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जगन्नाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ
कापूस पैदासकार डॉ. रावसाहेब भारूड यांनी प्रशिक्षणामागील हेतू सांगितला. डॉ.
उत्तमराव होले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पांडुरंग हरेर, डॉ. अशोक जाधव, डॉ.
मारुती मांजरे आदी उपस्थित होते.
|